औरंगाबाद – सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सकाळी मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर भाजपच्या वतीने ही सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज सकाळी औरंगाबाद शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या गुलमंडी तील सुपारी हनुमान मंदिरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आले त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील याच हनुमान मंदिरासमोर सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांची स्तुतीही केली. तसेच राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
हनुमान चालीसा पठना दरम्यान मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातली याबद्दल भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ही कुठल्याही पक्षाची टोपी नाही ही हिंदुत्वाची ही टोपी आहे. तसेच जो हिंदू हित की बात करेगा वो देश पे राज करेगा अशी प्रतिक्रिया केणेकर यांनी दिली.