नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे. मात्र आता तोल वसुली २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे. एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार असल्याचं पत्र सरकारने जारी केलं आहे. वाहतूक उद्योगीशी संबंधित वर्गाने या निर्णयाचा विरोध केला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एनएचएआयच्या एका पत्राचं उत्तर दिलं आहे. एनएचएआयने ११ ते १४ एप्रिल या काळात पत्रव्यवहार केला होता. गृह मंत्रालयाने खाजगी आणि संस्थांच्या अनेक कार्यांसाठी २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे. टोल वसुली सुरू केल्यामुळे सरकारला यातून महसूल मिळेल आणि एनएचएआयलाही आर्थिक लाभ होईल, असं कारण टोल सुरू करण्यामागे देण्यात आलं आहे.रस्ते परिवहन मंत्रालयाने एनएचएआयला पत्र लिहिलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व ट्रका आण मालवाहू वाहनांच्या आंतरराज्यीय हालचालीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे एनएचएआयने गृह मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी आणि टोल वसुली २० एप्रिल २०२० पासून सुरू करावी, असं या पत्रात म्हटलं आहे.
केंद्र सरकारने वाढवलेल्या लॉकडाऊनसंबंधी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामध्ये विविध सेवांसह ट्रक वाहतुकीलाही २० एप्रिलपासून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्याच ट्रकांना परवानगी होती. पण आता सर्व प्रकारच्या मालवाहू ट्रकांना परवानगी दिली आहे. याशिवाय महामार्गावरील ढाबे आणि ट्रक दुरुस्तीचे गॅरेज यांनाही सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण यासोबतच आता टोल वसुलीही सुरू होणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय वाहतूक काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि आमचा समुदाय अनेक अडथळे असतानाही हे काम करत आहे, असं म्हणत संघटनेने नाराजी व्यक्त केली. या संघटनेअंतर्गत ९५ लाख ट्रक आणि परिवहन संस्था येतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”