हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे वाढत्या महागाईने जनता त्रस्त असतानाच आता प्रवास करताना सुद्धा तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. आता एक्स्प्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार असून येत्या 1 एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात (Toll Tax) वाढ करणार आहेत. ही दरवाढ 5 टक्के किंवा 10 टक्के होऊ शकते.
टोलच्या किमती वाढवण्यासाठी NHAI चे प्रकल्प अंमलबजावणी युनिट (PIU) काम करत आहे. सर्व पीआययूंकडून 25 मार्चपर्यंत सुधारित टोल दरांचा प्रस्ताव पाठवला जाईल, ज्याची अंमलबजावणी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर केली जाईल. यावेळी कार आणि हलक्या वाहनांसाठी टोलचे दर पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून इतर अवजड वाहनांसाठी 10 टक्क्यांपर्यंत टोल टॅक्स वाढू शकतो.
टोल दरवाढीचा फटका नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाना सुद्धा बसणार आहे. सध्या या एक्स्प्रेस वेवर प्रति किलोमीटर 2.19 रुपये टोल आकारला जात असून त्यात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. सध्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर दररोज अंदाजे 20 हजार वाहने ये-जा करत असून, येत्या सहा महिन्यांत त्यांची संख्या 50 ते 60 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मासिक पासही महागणार आहे
टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या लोकांना मासिक पासची सुविधा देण्यात येते. सहसा हे पास स्वस्त असतात मात्र त्याच्या किमतीत सुद्धा 10 टक्के वाढवण्याचीही NHAI ची योजना आहे. यामुळे इथून पुढे प्रवास करताना खिशाला आणखी कात्री लागणार आहे.