हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास हिवाळा ऋतू संपत आला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने थंड व कोरडे असतात. या महिन्यात अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. आता फेब्रुवारी म्हण्यातही तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही नाशिकमधील अशी खास TOP 10 ठिकाणे आहेत कि तेथे पर्यटनाचा आनंद लुटू शकता. पाहूया अशी ठिकाणे…
नाशिक येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर, रामकुंड, सप्तश्रुंगी मंदिर, पंचवटी, काळाराम मंदीर, पांडवलेणी, मुक्तीधाम, सुला वाईनयार्ड, इगतपुरी हिलस्टेशन, व्हॅलोनी वाईनयार्ड, हरिहर किल्ला, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर डॅम, नाणी संग्रहालय, दूधसागर धबधबा, ब्रम्हगिरी अशी एकूण दहा ठिकाणे आहेत.
नाशिक जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. आजही येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून साधू, महंत आणि भाविक गोळा होतात. नाशिक फिरण्याचे ठिकाण तर आहेच पण इथे फिरता फिरता इथली संस्कृती, इतिहास बाजारपेठ, मंदीरे यांची ओळखही तुम्हाला होईल.
1) त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple)
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. ज्यामुळे या ठिकाणी बारा वर्षांतून एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यात येतो. त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. या मंदिराच्या चारी बाजुंना कोट बांधलेला असून पूर्वेकडे मुख्य दरवाजा आहे. मंदिरावर अतिशय सुंदर कोरिवकाम करण्यात आलेलं आहे.
2) रामकुंड (Ramkund)
नाशिकमधील गोदावरीच्या पात्रात बांधण्यात आलेलं रामकुंड हे ठिकाण. प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्नान करत होते. ज्यामुळे रामकुंडाला पवित्र स्थळ मानलं जातं. पेशवेकालिन कालखंडात या कुंडाची पुर्नबांधणी करण्यात आली. या कुंडाजवळच अस्थिविलय तीर्थदेखील आहे. महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,यशंवतराव चव्हाण अशा राजकीय नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आलेल्या आहेत.
3) सप्तश्रुंगी मंदिर (Saptashrungi)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असे नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यातील त्यापैकीच एक सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. सप्तश्रुंगी हे आदिशक्तीचे मुळ रूप मानले जाते. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असून तिच्या गाभाऱ्याला शक्तिहार, सुर्यहार आणि चंद्रहार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यांतून देवीचे दर्शन घडते.
4) पंचवटी (Panchvati)
नाशिमध्ये तशी पाहिली तर अनेक धार्मिक स्थळे आहेत. ज्यामुळे नाशिकमधील या भागाला पश्चिम भारताची काशी असे म्हंटले जाते. नाशिक शहरात प्रसिद्ध असलेले पंचवटी हे गोदावरीच्या डाव्या तीरावर वसलेले एक ठिकाण आहे. नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. या मंदिराजवळ पाच वडाच्या झाडांपासून तयार झालेल्या या ठिकाणाला पंचवटी असं म्हणतात. या भागात पंचवटी आणि गोदावरीच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत.
5) काळाराम मंदीर (Kalaram Temple)
नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रसिद्ध आहे. भगवान रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे. पुर्वी लाकडी बांधकाम असलेले मंदीर 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी पुन्हा काळ्या दगडात बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील रामाच्या अनेक सुंदर मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे. या मंदिराची रचना आणि कोरीवकाम पाहण्यासारखे असून त्यात प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण यांच्या काळा पाषाणातील मुर्ती आहेत.
6) पांडवलेणी (Pandavleni Caves)
नाशिकमध्ये फिरण्यासाठी आल्यास या ठिकाणी पांडवलेणी देखील पाहण्यासारखी आहेत. एका मोठ्या टेकडीवर ही प्राचीन लेणी असून ती जवळजवळ दोन हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. या लेण्यामध्ये मुख्य चोविस लेणी असून त्यामध्ये बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने अनेक देवदेवतांच्या मुर्ती आढळतात.
सातवाहन आणि क्षत्रप राजवंशाने ही लेणी कोरण्यास मदत केल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. ज्यावरून नाशिकवर पूर्वी सातवाहन राजाचे अधिराज्य असल्याचा पूरावा मिळतो. या ठिकाणी शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन तुम्हाला पहायला मिळते. पांडवलेणी पाहण्यासाठी काही प्रमाणात फी आकारली जाते. ही लेणी पाहण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून तिथपर्यंत पोहचण्यासाठी अर्धा तास चालत जावे लागते.
7) मुक्तीधाम (Muktidham)
मुक्तीधाम हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ असलेलं एक भव्य दिव्य मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केलेले असून हे मंदीर स्वच्छता, पवित्रता आणि शांतीचे प्रतिक मानले जाते. या मंदिरातील बारा ज्योर्तिलिंगाचे देखावे प्रसिद्ध आहेत. शिवाय या मंदीराच्या भिंतीवर गीतेचे श्लोक कोरण्यात आलेले आहेत. या मंदीराला भेट दिल्यावर अनेक देवदेवतांचे दर्शन तुम्हाला घडू शकते.
8) सुला वाईनयार्ड (Sula Vineyard)
पर्यटनाश नाशिक जिल्ह्यात आपल्याला एक प्रसिद्ध ठिकाण पहायला मिळते. ते म्हणजे नाशिकमधील सुला हे एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं वाईन गार्डन आहे. नाशिक जिल्हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामुळे नाशिकमध्ये अनेक लहानमोठ्या वाइनरी आहेत. मात्र या सर्वात सुला वायनरी मध्ये जाणं पर्यटकांना फार आवडतं.
या ठिकाणी सर्वोत्कृष्ट वाईनचं उत्पादन केलं जातं. या वायनरीमध्ये एक वाईन टेस्टिंग रूमदेखील आहे. ज्या ठिकाणी पर्यटक वाईनची टेस्ट घेऊ शकतात. अत्यंत कमी खर्चात तुम्ही या वायनरीत फेरफटका आणि वाईनची टेस्ट चाखू शकता. या ठिकाणी तुम्हाला भव्य दिव्य द्राक्षांचे मळे फिरण्याची, उपहारगृहाची सोय मिळते. ज्यामुळे फिरण्यासाठी आणि मनसोक्त फोटोसेशन करण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.
9) इगतपुरी हिलस्टेशन (Igatpuri Hill Station)
सह्याद्रीच्या पर्वतरांगानी घेरलेलं इगतपुरी हिलस्टेशन एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्वतरांगानी घेतलेलं हे हिलस्टेशन असल्यामुळे उन्हाळ्यात थंड ठिकाणी राहण्याचा अनुभव घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. इगतपुरीत प्राचीन मंदीरे, विपश्यना केंद्र, त्रिंगलवाडी किल्ला, धबधबे आणि जंगल सफारीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पावसाळ्यात फिरायला येणं हा एक अद्भूत अनुभव असतो.
दूधसागर धबधबा (Dudhsagar Falls)
नाशिकमधील दूधसागर धबधबाही खूप प्रसिद्ध आहे. ज्याला या ठिकाणी सोमेश्वर धबधबा या नावानेही ओळखलं जातं. नाशिक बस स्टेशनपासून हा धबधबा साधारणपणे नऊ किलो मीटरवर आहे. दहा मीटर उंच असलेला हा दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. हा धबधबा नाशिकमधील आंबेडकर नगरमध्ये वसलेला आहे.