औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन केले जात आहे, तर अनेक जण गावी जात आहेत. रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या अनेक रेल्वेंचे आरक्षण फुल्ल आहे. अशा परिस्थितीत दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. परंतु औरंगाबादकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. परंतु गोवा, केरळ, राजस्थान, जयपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
प्रत्येक उन्हाळ्यात मागणी करूनही विशेष रेल्वे सोडण्याकडे कानाडोळा केला जातो. वाढीव बाेगी आणि एखाद्या विशेष रेल्वेवरच प्रवाशांना समाधान मानावे लागते, अशी ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे.