हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी नागपूरच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. यावर भाजपच्या नेत्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांचा देखील समावेश होता.नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका करत “मर्दानगीवर कलंक.. हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा.. बायला कुठला” अशी बोचक टीका केली होती. मात्र आता त्यांच्या या टीकेमुळे तृतीयपंथी समूदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नितेश राणे यांच्या या विधानंतर तृतीयपंथ समुदायाने टीकेचा निषेध नोंदवत पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरु केले आहे. तृतीयपंथ समुदायाने याबाबत आक्रमकाची भूमिका घेत नितेश राणे यांना आपल्या चुकीच्या वक्तव्याबाबत त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर कालपासून पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ केली असल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीच्या नेत्या शमिभा पाटील यांनी केला आहे. आंदोलकर्त्यांना काही झाले तर त्याला जबाबदार पोलीस असतील असे ही त्यांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर, राणे जिथे कुठे असतील तिथे येऊन त्यांच्या तोंडाला काळ फासू असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सध्या राणे यांच्या वक्तव्याचा सोशल मिडीयावरुन तीव्र निषेध नोंदविला जात आहे. त्याचे हे वक्तव्य त्यांच्या पदाला शोभणारे नाही अशी मागणी देखील सोशल मिडीयावरुन करण्यात येत आहे.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे देखील राजकिय वातावारण तापले आहे. भाजप नेते ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखीन कोणते वळण लागते हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.