सांगली जिल्ह्यातील दुधोंडीत तिहेरी हत्याकांड : धारदार शस्त्राने तिघांचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | पलूस तालुक्यातील वसंतनगर – दुधोंडी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्यात अरविंद बाबुराव साठे (वय-45) , विकास आत्माराम मोहिते (वय- 32), सनी आत्माराम मोहिते (वय- 27) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत तर अन्य चौघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा खूनी हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली आणि घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, दुधोंडी येथील या मयत कुटुंबाच्या संबंधीत एका मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि याच पूर्व वैमनस्यातून काल रात्रीही या दोन कुटुंबात वाद झाला होता. पोलिसांंनी हा वाद मिटवला होता. मात्र तरीही आज विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते हे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेने दुधोडी परिसर हादरला आहे. पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. एकाच वेळी तिघांची हत्या करण्याची घटना घडल्याने पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावात तणावसदृष्य परिस्थिती असली तरी पोलीस मोठ्या संख्येने घटना स्थळी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पलूसच्या पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment