सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक व क्रेनवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
वनविभागाने दिलेली माहिती अशी, सातारा वनविभाग अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत होते. यावेळी गजवडी गावच्या हद्दीत लाकडांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या वाहतूकीतील वाहन ट्रक (क्र. एम.एच 10 सी.आर. 4891) पकडण्यात आला. तर सदरचा लाकूड भरण्यासाठी वापरणेत आलेली क्रेन वाहन (क्र. एम.एच. 11 सी. डब्ल्यु. 1140) देखील जप्त करणेत आली. सदर प्रकरणी विजय दत्तात्रय साठे (रा.कवठे महाकाळ, जि.सांगली), मयुर सतीश फणसे (रा.देगांव ता.जि. सातारा) यांचेवर कारवाई करणेत आली. अवैध वृक्षतोड करणे तसेच त्याची विनापरवाना वाहतूक करणे हे भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार गुन्हा आहे. कोणीही अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर वनविभागास तात्काळ कळवावे असे आवाहन करणेत येत आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (वनी) सुधीर सोनवले यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सातारा डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल रोहोट मारुती माने, वनपाल परळी अशोक मलप, वनरक्षक सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, सूर्याजी ढोबरे, महेश सोनावले, संतोष काळे, श्रीमती साधना राठोड, श्रीमती सिंधू सानप य वाहनचालक संतोष दळवी, सुमित वाघ, शैलेश वाघ यांनी केली.