सिडको बसस्थानकातून वीस दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर; ‘या’ मार्गावर धावली बस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावर शासनाने त्यांची पगारवाढ करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने अजूनही लाल परीची चाके आगार आतच रुतली आहेत. परंतु संपातील काही कर्मचारी कामावर परतल्यामुळे काल सिडको बसस्थानकातून तब्बल 20 दिवसांनंतर जाण्यासाठी चार बसेस रवाना करण्यात आल्या. तर शनिवारी औरंगाबाद विभागातील तब्बल 40 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.

राज्यभरात एसटीचे एकूण 18 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. यात सिडको बसस्थानकातील काही कर्मचारी देखील कर्तव्यावर पुन्हा एकदा रुजू झाले गेले काही दिवस पुणे मार्गावरच खाजगी शिवशाही बसेस धावत होत्या. आता जालना साठी देखील बस धावल्याने रोज ये-जा करणाऱ्यांची काही प्रमाणात सोय झाली आहे. जिल्हाभरातील इतर आगारातून मात्र अजूनही बस सेवा सुरू झालेली नाही. आगामी दोन दिवसात इतर आगारातून बसेस धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिडको बस स्थानकातील 4 वाहक व 4 चालक काल कामावर हजर झाले. त्यामुळे आगार प्रमुखांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पहिली बस जालना कडे 22 प्रवासी घेऊन रवाना केली. त्यानंतर दुसऱ्या बसमध्ये 15, तिसऱ्या बसमध्ये 25 तर चौथ्या बस मध्ये 11 प्रवासी घेऊन बसेस रवाना झाल्या. तसेच काल एसटी महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागातील तब्बल 40 कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद आगार 2 मधील 8, वैजापूर 1, गंगापूर 4, पैठण 15, सिल्लोड 7 व विभागीय कार्यशाळेचे 7 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत औरंगाबाद विभागातील एकूण 118 कर्मचाऱ्यांना निलंबित करून 104 जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.