सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा आज मृत्यु झाला आहे. श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे हा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून याचा अहवाल उद्या प्राप्त होईल. दरम्यान या रुग्णांमध्ये सारीसदृश विषाणूची लक्षणे दिसल्याचंही समजत आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी अशा एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे नेण्यात आलं आहे. बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिक आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे उपस्थित 4 अशा एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 40 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुनेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १४ वर गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये तसेच आरोग्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कोणालाही घशात दुखत असेल किंवा ताप आला असेल तर त्यांनी तात्काळ आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.