बेलदरेत ऊसाच्या फडात आढळली वाघाटी जातीच्या मांजरीनीची दोन पिल्ले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील बेलदरे येथील चव्हाण मळा शिवारात ऊसतोड चालू असताना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीची दोन पिल्ले आढळून आली. या पिल्लांबाबत स्थानिकांनी कराड वन विभागातीळ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित पिल्लांना ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलदरे येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात तोड सुरु होती. यावेळी तोडकऱ्यांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीची दोन पिल्ले फडात बेवारस अवस्थेत आढळून आली. यानंतरतोडकऱ्यानी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनीही दोन पिल्लांची माहिती वनविभागातील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वराडेतील वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, चोरेचे वनरक्षक अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पिल्ले ताब्यात घेतली.

सदर पिल्ले ही सुस्थितीत असून या पिल्लांच्या खाण्यापिण्यासह इतर गोष्टीची काळजी वनविभागाकडून घेतली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्रधिकारी तुषार नवले यांनी दिली. उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांनी पुढील देखभालीसाठी संबंधित पिल्लांना बोरीवली मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) प्रजनन व संशोधन केंद्रास पाठविण्यास आदेश दिले.

वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट)

वाघाटी जातीच्या पिल्लाबाबत काही महत्वाची वैशिष्ठे आहेत. या पिल्लांच्या चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा आहेत. याशिवाय चार गडद काळ्या रेषाही अंगावर असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात.

‘या’ ठिकाणी आढळतात

वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीच्या पिल्लांचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. अशा प्रकारची मांजरी व पिल्ले प्रामुख्याने ओलसर आणि कोरड्या पानझडी जंगलात तसेच झाडी आणि गवताळ प्रदेशात आढळतात.

प्रामुख्याने ‘हे’ अन्न खातात

पश्‍चिम महाराष्ट्रात, वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) मांजर मानवी वर्चस्व असलेल्या ऊस कृषी क्षेत्रामध्ये प्रजनन करत असतात. जेथे उंदीरांची घनता जास्त सरते. हे प्रामुख्याने उंदीर आणि पक्षी खातात, परंतु सरडे, बेडूक आणि कीटकांना देखील खातात. ही मांजर प्रामुख्याने जमिनीवर शिकार करते, आपली शिकार पकडण्यासाठी जलद, झटपट हालचाल करते.

शिकार केल्यास होतेय ‘ही’ शिक्षा

शिकार करणे अथवा पाळणाऱ्यास कठोर अशी शिक्षाही होऊ शकते. गुन्हा दाखल होऊन 7 वर्ष कैद 25 हजार रुपये दंड होऊ शकतो. वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) मांजर नजरेस पडल्यास जवळ जाऊ नये तसेच त्याला हाताळू नये, त्वरीत जवळच्या वनविभागास अथवा पोलीस पाटील यांना संपर्क करावा. सदर वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) यास भारतीय वन्यजीव (संरक्षण ) कायदा 1972 अंतर्गत संरक्षण देण्यात आले असून शेडूल 1 भाग 1 मध्ये आहे . हाताळणे, शिकार करणे अथवा पाळणाऱ्यास गुन्हा दाखल होऊन शकतो, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.