गडचिरोली प्रतिनिधी | एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गुंडुरवाही व पुलणार गावांदरम्यानच्या जंगलात आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर ह्याची पत्नी व जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याची माहिती आहे.
आज सकाळपासूनच पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान गुंडुरवाही व पुलणार गावांनजीकच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे दोन महिला नक्षलींचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर हृयाची पत्नी रामको नरोटी व शिल्पा दुर्वा यांचाही समावेश आहे.
या चकमकीत आणखी नक्षली ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, पोलिसांचे कुठलेही नुकसान झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल्यांची काही शस्त्रे व दैनंदिन वापराचे साहित्यही ताब्यात घेतले आहे. ११ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक होती. परंतु आदल्या दिवशी नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविल्याने दोन जवान जखमी झाले होते. तेव्हापासून तेथे पोलिस अभियान तीव्र करण्यात आले होते.