इस्लामपूर | मोटरसायकलवरून देवदर्शनाला जाताना पुणे-बेंगलोर महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) नजीक मोटारसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर दुचाकी वरील दोघी गंभीर जखमी झाल्या. या कराड तालुक्यातील तांबवे येथील आनंदा निजगुनी माने (वय – 45) असे अपघातातील मयताचे नाव आहे. तर अपघातात त्यांची पत्नी संगीता आणि भाची श्रुती या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आनंदा हे तांबवे हे कराड येथे वास्तव्यास असून, ते शेतमजुरी करतात. रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आनंदा हे मोटारसायकल (क्र.एम.एच.11/एफ-3415) वरून पत्नी संगिता, भाची श्रुती यांना घेवून जोतिबाच्या दर्शनासाठी निघाले होते. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते कामेरीनजीक आले असता, पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या धडकेत आनंदा हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलवरील त्यांच्या पत्नी संगिता आणि श्रुती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत आनंदा यांचा मुलगा अनिकेत माने यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.