अबू धाबी । संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 फेब्रुवारीपासून या देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. या नव्या कायद्यात कामगारांना नवीन अधिकार देण्यात आले आहेत. UAE च्या अर्थव्यवस्थेत भारतीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत भारतीय कामगारांनाही या नवीन कायद्याचे अनेक फायदे मिळतील, असे मानले जात आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के भारतीय आहेत आणि त्यांची संख्या 35 लाख आहे. UAE च्या खाजगी क्षेत्रात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक काम करतात. नवीन फेडरल डिक्री कायदा क्रमांक 33 हा कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणाची गॅरेंटी देतो. UAE च्या मानव संसाधन मंत्रालयाने सांगितले की, आता नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती जॉब कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट केली जाईल.
नवीन करारामध्ये प्रत्येक माहिती समाविष्ट केली जाईल
नवीन करारामध्ये कामगार, त्याचा नियोक्ता, नोकरीचे वर्णन, कामाचे तास, सुट्ट्या, सामील होण्याची तारीख, कामाचे ठिकाण, पगार, वार्षिक रजा, सूचना कालावधी यासह प्रत्येक माहितीचा समावेश असेल. गल्फ न्यूजशी बोलताना UAE चे वकील अली मुसाबा म्हणाले की,” या नवीन कायद्यामुळे आता नोकरीचा करार मर्यादित काळासाठी असेल, जो पूर्वी नव्हता. कंपन्या आता जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी कामगार ठेवू शकतील. त्यानंतर पुन्हा रिन्यूअल करावे लागेल.”
आठवड्यातून किमान एक सुट्टी मिळेल
सरकारने सर्व खाजगी कंपन्यांना नवीन कायद्यानुसार नवीन करार तयार करण्यास सांगितले आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत कंपन्यांना नोकरीचे करार बदलावे लागतील. या नवीन कायद्यामुळे आता कोणताही मालक कायमस्वरूपी कामगार ठेवू शकणार नाही. आता कामगारांनाही काही नव्या सुट्या मिळणार असल्याचे मुसाबा यांनी सांगितले. या कायद्याअंतर्गत कंपन्यांना आता दर आठवड्याला किमान एक तरी सुट्टी द्यावी लागेल.
याशिवाय घरी कोणाचा मृत्यू झाल्यास तीन ते पाच रजा, परीक्षेच्या तयारीसाठी 10 दिवसांची रजा, महिलांना 60 दिवसांची प्रसूती रजा, 45 दिवसांची गरोदरपणात रजा पगारासह आणि 15 दिवसांची रजा अर्ध्या पगारासह सशर्त मिळतील. या नवीन कायद्यामुळे कर्मचारी आणि मालक यांच्यात पारदर्शकता वाढेल. नवीन कामगार कायदा लागू करण्यामागे UAE चा उद्देश विदेशी कामगारांना आकर्षित करणे हा आहे. यामुळे UAE मधील नियोक्ते आणि कर्मचारी यांच्यात चांगले संबंध निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.