Tuesday, June 6, 2023

पदोन्नती मिळताच एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; विभागात खळबळ

जालना – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे हे दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक जालना विभागातील संग्राम ताटे यांना दोन दिवसांपापूर्व गृहविभागाने काढलेल्या पदोन्नती आदेशानुसार पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीसह त्यांची कोकण विभागात बदली झाली होती. दरम्यान बुधवारी रात्री ते शहरातील यशवंतनगर येथील राहत्या घरातून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगत ते घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईलसह इतर साहित्य ही घरीच ठेवले. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाही.

या घटनेची माहिती गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांना मिळाली. त्यानंतर ते गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते. शिवाय पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांचीही त्यांनी भेट घेतले. दरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांचा शोध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. मात्र ते मिळून आले नाही. अखेर गुरुवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल झाली आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक व कदीम जालना पोलिसांचे एक असे दोन पथक तापस कामी नेमण्यात आले आहेत. मात्र, पोलिस निरीक्षक अचानक गायब झाल्यावर शहरात एकच खळबळ उडाली आहे.