सातारा | सातारा शहरात टुव्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे. त्यांनी टुव्हीलर जशी व्यवस्थित चालवली तशी सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती. सातारा शहरात आज जी विकास कामे दाखवली जात आहेत ती फक्त नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केले आहे
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”सगळी नौटंकी सुरू आहे. हातातील संधी निघून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले असून, आगामी काळात पब्लिकच त्यांच्या नौटंकीवर पडदा टाकणार आहे. पाच वर्षे सत्ता असतानाही त्यांना साताऱ्याच्या विकास करता आलेला नसून त्यांनी कामांच्या माध्यमातून सातारकरांची स्वप्नपूर्ती करणे आवश्यक होते. पालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवत सत्ताधाऱ्यांनी अंदाधुंद कारभार केला आहे. याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवत असले, तरी बहुमताच्या जोरावर तो आवाज दाबण्यात येत आहे.
ग्रेडसेपरटवरून उदयनराजेंना कोपरखळी
ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना किती फायदा झाला, त्याचा वापर किती जण करतात, हे तपासणे गरजेचे आहे. त्या ग्रेड सेपरेटरच्या फलकावरील संकल्पक म्हणून एक नाव होते. ग्रेड सेपरेटरचा वापर दिवसेंदिवस कमी होत असून, आगामी काळात त्याला प्रेक्षणीयस्थळाचा दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे का होईना, बाहेरचे पर्यटक येतील व त्याचा वापर करतील, अशी कोपरखळीही त्यांनी उदयनराजे यांना मारली.