सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा येथील शिवतीर्थावर राज्यपाल व रावसाहेब दानवे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. तसेच विरोधात घोषणाबाजीही केली.
यावेळी संतप्त झालेल्या उदयनराजे भोसले समर्थक व शिवभक्तांनी मंत्री दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारले. यावेळी समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. रावसाहेब दानवे यांचा पुतळा दहन करताना उदयनराजे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा निषेध : साताऱ्यात उदयनराजेंच्या समर्थकांनी जाळला प्रतीकात्मक पुतळा pic.twitter.com/ioZ7L2OdMP
— santosh gurav (@santosh29590931) December 4, 2022
रावसाहेब दानवे काय म्हणाले होते?
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते की, “आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते. जेवढं आम्ही शिकलो, जेवढं आम्ही वाचलं, जेवढं आम्ही ऐकलं त्याचा आधार घेऊन बोलतोय. आमच्यापेक्षा अधिक वाचणारं कुणी असेल किंवा त्यांच्या वडिलांना, जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण आमची माहिती अशीच आहे की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते.”
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. “आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील,” असं कोश्यारी म्हणाले.