छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो शंभूभक्त समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी राज्याच्या विविध भागातून शंभूज्योत आणत असतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचे कार्यक्रम स्थानिक पातळीवर करण्यात आले.

आज पहाटे छत्रपती संभाजी महारांजाच्या समाधी स्थळावर नित्यनियमाने होणारी पूजा ग्रामस्थांनी केली. महाराजांच्या समाधीवर जलाभिषेक करुन अभिवादनाला सुरूवात झाली. त्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रथेप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांची प्रार्थना करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी कवी कलश यांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेवून महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याहस्ते समाधीपरिसरात रक्तचंदन आणि अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॅा सचिन पुणेकर यांनी या वृक्षाचे महत्व सांगितले. त्याचबरोबर या वृक्षारोपणासाठी विविध नद्यांतून पाणी आणल्याचे मिलिंदभाऊ गायकवाड यांनी सांगितले. अभिवादनासाठी वढु बुद्रुकचे सर्व ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like