आता रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?’, प्रवीण दरेकर यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना राजकारणाचा पाराही चढला आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचं चित्र आहे. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात आहे, हे राजकारण नाही का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता. या मुद्द्यावरून आता भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.

‘गुजरातमध्ये भाजपने रेमडेसिवीर चोरुन आणले होते का? असा सवाल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी विचारला होता. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरातल्या कार्यकर्त्यांना रेमडेसिवीर दिल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं आहे. नवाब मलिक आता रोहित पवारांना हे इंजेक्शन कुठून चोरुन आणलं हे विचारणार का? मलिक हे खरंच निष्पक्ष असतील तर ते रोहित पवार यांच्यावर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का?’ असा खरमरीत सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड,सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीकड़ून देण्यात आली आहे.

You might also like