सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
काल मेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबत एक वक्तव्य केले दिले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी असल्या आव्हानाला भिक घालत नाही. आव्हान कुणाचे स्वीकारायचे हे मी स्वतः ठरवतो. आव्हान सारखे बुद्धिभेद करणारे शब्द त्यांना वापरू दे बाकी पुढे बघू, असे खा. उदयनराजे यांनी म्हंटले.
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीला खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा सर्वार्थाने विकास साधला जाईल. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबरोबरच पुरातत्व विभाग व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांचे योगदान अमूल्य आहे. आम्ही त्यांच्या घरण्यातील असलो तरी छत्रपती शिवराय कोणत्या एका घराण्यापुरते मर्यादित नव्हते. सर्वच जाती-धर्मांतील लोक हे माझं कुटुंब आहे, हा विचार या युगपुरुषांनी मांडला, तो आचरणात आणला. त्यामुळे समाधीस्थळाचा विकास साधणे ही आमच्या बरोबरच शासनाची देखील जबाबदारी आहे.
मी अजित पवारांच्या आव्हानाला भिक घालत नाही; उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया pic.twitter.com/PYK6vUJvkU
— santosh gurav (@santosh29590931) April 10, 2023
आज सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत पुढे जात असताना आपण आपला इतिहासही विसरता कामा नये. कारण साडेतीनशे वर्षांनंतरही शिवरायांचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे नव्या पिढीला इतिहास समजावा, यासाठी इतिहासाचे जतनही व्हायला हवे.
‘जो-तो आप-आपल्या पक्ष वाढीसाठी बोलत असतो. असल्या कोणत्याही आव्हानांना मी भीक घालत नाही. कोणती आव्हानं स्वीकारायची आणि कोणती नाही, हे माझं मी ठरवतो. सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवार यांनी लढवावी, अशी इच्छा त्यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांचे साताऱ्यात दौरे वाढले आहेत. कदाचित त्यांना भविष्यात इथून उभं राहायचं असावं, असे उदयनराजे यांनी म्हंटले.
अजित पवार काय म्हणाले?
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी साताऱ्याचा पुढचा खासदार व जावळीचा आमदार हा राष्ट्रवादीचा असेल, असे विधान केले होते. तसेच आव्हानही दिले होते. त्यांच्या या आव्हानाला आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.