हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी 2024-2025 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. तर, हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना थेट जादूच्या प्रयोगाशी केली आहे.
पेण येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “लहानपणी एक जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवायचा. मंत्र म्हणायचा. झोळीत हात घालायचा आणि कबुतर काढायचा. तेव्हा आश्चर्य वाटायचं, त्यावेळी आपण यालाच मत देणार असे ठरवायचो. पण आपल्या लक्षात हे आलं नाही की कबुतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली, हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे”
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यातील विविध मतदारसंघातील लोकांना भेट देणार आहेत. याची सुरुवात त्यांनी आजपासून रायगडमधील पेणला भेट देऊन केली आहे. पेणमध्ये केलेल्या भाषणातच उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “मी एका लोकसभेत जेवढे मतदारसंघ येतात तेवढ्या मतदारसंघात भेट देणार आहे, तेथील लोकांशी चर्चा करणार आहे” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणा
निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये, “पुढील काळात 3 लाख कोटींचा व्यापार कृषी क्षेत्रातून होईल, जास्त प्रमाणात कृषी क्षेत्रात खाजगी आणि सरकारी गुंतवणूक करण्यात येणार, केंद्र सरकार तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर होण्यावर भर देणार, 80 कोटी जनतेला मोफत धान्य वाटप होणार” अशा तरतुदींचा समावेश आहे.