जाहिराती, मौजमजेसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाहीत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना, “शिंदे फडणवीस सरकारकडे जाहिराती, मौजमजेसाठी पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाही” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले..

शिंदे सरकारवर ताशेरे ओढत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थ झालो आहे. विषय रोज नवीन-नवीन आहेत. काही विषय खूप वर्षांपासून तसेच्या तसे आहेत. आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्यानंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये. मात्र आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना या आरोग्य व्यवस्थेने केला होता. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत”

मुख्यमंत्री कुठे आहेत?

त्याचबरोबर, ” मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात दुर्गम भागात औषधे पुरवली. ड्रोनने दुर्गम भागात औषधे पुरवली. मी देखील दुर्गम भागात भेट दिली होती. अनेक डॉक्टर-नर्सचा मृत्यू झाला. आज त्यांना बदनाम केलं जातंय. ठाणे हॉस्पिटल असेल.. दुर्घटना घडताहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत. एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत. दुसरा हाफ कुठे आहे?” अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.

पुढे बोलताना, “कोरोनाचे संकट होतं तेव्हा महाविकास आघाडीचा सरकार होतं. आताही आरोग्य यंत्रणा तिच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला. हे सरकार नपुसक असल्याचं कोर्टानं सुद्धा म्हटलंय. मी शिवसैनिकांना सांगतोय आपल्या सरकारी रुग्णलयात जा. तिथे वस्तुस्थिती काय आहे, डीन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन समजून घ्या. हा कारभार माणुसकीला सोडून चालू आहे” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.