हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदार संघांचा बैठकीतून आढावा घेतला. यावेळी “साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांना बळ द्या,” असा कानमंत्र देत सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ठाकरेंनी आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप पाठोपाठ आता उद्धव ठाकरे गट शिवसेनेनेही अंतर्गत बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 2 टप्प्यात राज्यातील लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईत आज त्यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी दुपारी 3 वाजता सातारा जिल्हा लोकसभा मतदार संघ व कराड,पाटण विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. या बैंठकीस शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत, सुरज चव्हाण, दिवाकर रावते, सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शिवसेनेचे उपनेते तथा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासह जिल्हयातील शिवसेनेचे तालुका प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रथम सातारा लोकसभा मतदार संघात त्यांच्या गटाची असलेली ताकद, कार्यकर्त्ये व पक्षातीळ कार्यकर्त्याचीही असलेली संख्या आदींसहअनेक विषयावर चर्चा केली. तसेच सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांना बळ देण्याचा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर त्यांनी कराड व प्रामुख्याने पाटण विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. या मतदार संघाबाबतही त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.
“होय, आज उद्धव ठाकरेंच्यासोबत मातोश्रीवर बैठक झाली” : हर्षद कदम
उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मातोश्री येथील निवासस्थानी सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधला. यावेळी कदम यांनी होय आज माननीय उद्धव ठाकरेजी यांच्यासोबत मातोश्रीवर आमची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आमच्याकडून सातारा लोकसभा आणि कराड, पाटणसह इतर विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा केली. या ठिकाणी आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकीच्या संदर्भात अनेक सूचना त्यांनी दिल्या असल्याची माहिती कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.