हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. “हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवले आहे. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. असे भोगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत. कोरोनामुळे 2 वर्षे नाटक, चित्रपट बंद होते. आता फुकटात करमणूक मिळत असेल, तर का नको? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त आज ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी आहे. आम्ही अशा प्रकारचे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिले आहेत. आपल्या देशात हिंदू अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी म्हणून इतर लोकांना हाकलून द्यायचे असे चालणार नाही. आम्ही हिंदू आहोत हे सांगावे लागत नाही.
आज वेगवेगळे झेंडे का फडकावे लागतायत? याचा विचार करणे आवश्यक आहे. आम्ही कधीही आमचा झेंडा बदललेला नाही. अस्तित्व असले तर टिकवण्याची गरज असते. आज काही जण आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.