मुंबई प्रतिनिधी| छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याच्या चर्चा मागील काही दिवसापासून सतत होत आहेत. अशातच भुजबळ यांना शिवसेनेत घेऊ नये म्हणून नाशिकचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विषयावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण त्यांना शिवसेनेत घेणार नाही असे आश्वासन दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते काल मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत छगन भुजबळ यांना पक्षात घेतल्यास काय फायदे तोटे होऊ शकतात यावर विस्ताराने चर्चा केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एका सुरुवात उद्धव ठाकरे यांना सांगितले की आम्ही भुजबळांनी दिलेला त्रास अद्याप विसरलो नाही. त्यांना पक्षात घेतल्यात त्यांच्या विरोधात आम्ही एवढे दिवस लढा दिला. त्या लढ्याला अर्थ काय असा सवाल उपस्थित केला.
सर्व बाबींचा सारासार विचार करून उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना पक्षात घेतले जाणार नाही असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. बाळासाहेब ठाकरे माझे वडील होते. त्यांना दिलेला त्रास देखील मी अद्याप विसरलो नाही अशा शब्दांचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी आपण छगन भुजबळ यांना पक्षात घेणार नाही असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.