नवी मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच ठाकरे यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. लाईव्ह येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडत असल्याचे जाहीर केले.
शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने आज उद्याच्या विधानसभा फ्लोअर टेस्टला परवानगी दिल्याने ठाकरे सरकारवर नामुष्की ओढवली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे भाषण खालील प्रमाणे –
आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाटचाल केली. सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं. उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व चांगलं सुरु असताना काही जणांची नजर लागली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत विधानपरिषदेचा राजीनामा दिला.
बहुमत चाचणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेले ९ दिवस शांत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अखेर सत्तानाट्याच्या अंकात जोरदार एन्ट्री झालेली आहे. फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं, अशी विनंती केली. तर गुवाहाटीला असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारही उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.