हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती यावेळी दिली आहे.
आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनावर लस आली आणि ती आपण लोकांना देतही आहोत. पण लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय. कोरोनावर उपचार पद्धती आणि आरोग्य सेवांबाबत सर्व प्रयत्न करत आहोत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय इतर कोणता पर्याय आहे तुम्हीच सुचवा”, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला.
आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झालं, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही टोला लगावला.
यावेळी त्यांनी विरोधकांना विनंती केली की कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. त्यानंतर निर्णय घेऊ अस मुख्यमंत्री म्हणाले.