हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा फणा काढून डसायला लागला असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर असून येथील रामलीला मैदानावरील जाहीर सभेत त्यांनी संतोष बांगर यांच्यासहित शिंदे- फडणवीसांवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दारांवर वेळ घालवणार नाही पण काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला. तसेच गद्दार अनेक झालेत, मात्र हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिली आहे असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सरकारचा शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. शेतकरी हवालदिल आहे. पण सरकार फिरण्यात व्यस्त आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ आहे तर दुसरीकडे या स्थितीत फडणवीस जपानला गेले अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली.