हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री ठाकरेंनी चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत आपल्या व्यथा मांडल्या. काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी पूरग्रस्त महिलेने केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचं म्हणणं ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी नुकसानीची भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले.
याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, जावळी, वाई तालुक्यात दरडी, मातीचे ढिगारे कोसळणे व महापुर असे संकट ओढवलेले आहे. त्या ठिकाणीही झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीचा आढावा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जाणार आहे.