हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच विधान परिषद सदस्यत्वेचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंनी आपल्या रणनीती मध्ये बदल करून आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विधानपरिषद संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचं समजत आहे. 40 पेक्षा जास्त आमदार शिंदे गटात सामील झाल्याने विधान परिषदेतील आमदारांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे एक एक आमदार महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीमुळे उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. मात्र विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा हा सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचा आमदारकीचा राजीनामा तेव्हा गृहीत धरला नव्हता. आता मात्र त्यांनी आपला विचार बदलला असून राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत आगामी पावसाळी अधिवेशनात उपस्थिती लावणार का, याची उत्सुकता लागली आहे.