हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एका गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच बोलले होते कि मी आदित्यला मुख्यमंत्री होण्यासाठी तयार करतो आणि मी दिल्लीला जातो , मात्र नंतर त्यांनी माझ्याच माणसांसमोर मला खोट ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हा आरोप केला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात ते पाहायला हवं.
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेवर घाव घालण्याचा भाजपचा डाव होता. वापरा आणि फेकून द्या हीच भाजपची गॅरेंटी आहे. अखेर 2019 मध्ये भाजपने माझ्यासोबतही तेच केलं. मी माझ्या वडिलांना वचन दिले होते की एक दिवस तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करून दाखवेन. 2019 अमित शाह आणि आमच्यात ठरलं होते कि शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री असेल. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते आदित्यला मुख्यमंत्री होण्यासाठी तयार करतील आणि ते स्वतः दिल्लीला जाणार आहेत. परंतु नंतर त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजप आता व्हॅक्यूम क्लीनर आहे, ती भ्रष्टाचाऱ्यांना शोषून घेते आणि त्यांना क्लीन चिट देते – प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार… हेच त्यांचं पार्टी विथ नो डिफरंट… पक्ष तोडणे, घर तोडणं, छापेमारी टाकणे हीच भाजपची पोकळ गॅरेंटी आहे. नोटाबंदीनंतर मोदी म्हणाले होते, मला १०० दिवस द्या. एप्रिल 2024 मध्ये 2,700 दिवस झाले, काय झाले? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदींनी सांगितलं होते परंतु आज केवळ शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला आहे. गेल्या 10 वर्षात मोठे उद्योग कुठे गेले? जो महाराष्ट्रावर अन्याय करेल तोच आमचा विरोधक असेल. जे उद्योग महाराष्ट्रात जायचे होते ते गुजरातमध्ये गेले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.