शिंदे गटातील आमदार तुम्हाला भेटायला आले तर? ठाकरेंच्या उत्तराने तुम्हीही व्हाल चकित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. काही विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी सुद्धा ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. या सर्व घडामोडिंना १ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता हे सर्व आमदार तुम्हाला भेटायला आले तर? असा थेट सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सामनातील मुलाखतीत विचारला. यानंतर ठाकरेंनी स्पष्टच शब्दात उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याकडे येण्याची त्यांच्या कोणाची हिंमत नाही. आले तर वगैरे विषयच नाही. ते येऊच शकत नाही. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव ठाऊक आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजे बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे” असे म्हणत उद्धव ठाकरे शिंदे गटावर निशाणा साधला. मी बाळासाहेबांचे विचार सोडले. हे सोडलं, ते सोडलं म्हणतात पण हे सारं ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही पडलो असं जे म्हणाले त्यांनीच आता राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यात असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

ते पुढे म्हणाले, २०१४ ते २०१९ मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला. त्यावेळी मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजानीमे घेऊन फिरतो. राजीनामा घेऊन फिरायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? का वेळ आली होती तुमच्यावर?” असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्याने शिंदे गटातील आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे.