हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला २१ जून पासून सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावल्यानंतर केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, आता लसीकरणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे, आयआयटी संस्था आणि अधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थांना मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे बॅनर्स विद्यापीठात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘देशातील 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार’, असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, यूजीसीने विद्यापीठे, महाविद्यालये यांना बॅनर्स लावण्याचे दिलेले आदेश म्हणजे आदेश लादण्याचा प्रकार असून निशुल्क लसीकरण ही सरकारची जबाबदारी आहे मग त्यासाठी बॅनर्स लावून पंतप्रधानांचे आभार का मानायचे. मोफत लसीकरण करून सरकार देशातील नागरिकांवर उपकार करत नाही असे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे व उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी म्हटले आहे.