हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशाची बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बॅगेत सोनं, चांदी, चांदीच्या मूर्ती, देवांच्या मूर्ती असल्याची माहिती आहे. प्रसाद लाड हे मुंबईतील माटुंगा परिसरात राहतात. हि बॅग कोणी ठेवली याचा तपास पोलीस करत आहेत.
घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने प्रसाद लाड याना दिली. बॅग पाहताच परिसरात भीतीचे वातावरण झाले. त्यानंतर लाड यांनी माटुंगा पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती सापडली. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली. मात्र, ही बॅग कोणी आणि का ठेवली, याच उत्तर अजून मिळू शकले नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले होते. त्यातच आज त्यांच्या घरासमोर पैसे आणि सोन्याने भरलेली बॅग पाहून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.