केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून अज्ञातांनी निवृत्त शिक्षकाला घातला 74 लाखांना गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या कुपवाड रोडवरील खाताळनगर येथे राहणाऱ्या एका निवृत्त शिक्षकाला केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून तसेच विना पेपर कर्ज मंजूर झाल्याचे सांगत अज्ञात नंबरवरून तब्बल 73 लाख 95 हजार 797 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीचा प्रकार हा 02 नोव्हेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. या प्रकरणी किशोर दाभणे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी किशोर दाभणे हे निवृत्त शिक्षक आहेत. दाभणे आपल्या घरी असताना 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. तुम्हाला केबीसी कडून 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगून प्रोसेसिंग फी, बारकोट फी, पॅनकार्ड आणि एक्स्चेंज चार्जेस भरण्यास सांगितले. त्या मॅसेजवर दाभणे यांनी विश्र्वास ठेऊन एसबीजीआय बँकेतून मॅसेज मध्ये दिलेल्या बँक खात्यावर तब्बल 46 लाख रुपये भरले. त्यानंतर दाभणे यांनी कर्जासाठी रिलायन्स ऑनलाईन फायनान्स या अँप वरून अर्ज केला होता.

त्यानंतर दाभणे यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून 5 लाखांचे कर्ज विनापेपर मंजूर झाल्याचे सांगून काही चार्जेस भरण्यास सांगितले. सदरचे चार्जेस हे रिफंड असल्याचे सांगितल्याने त्यांनी 27 लाख 95 हजार 797 रुपये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर गुगल पे द्वारे भरले. दाभणे यांची अज्ञातांनी एकूण ७३ लाख ९५ हजारांची फसवणूक केली.