नवी दिल्ली । कोरोनामुळे शाळा बंद असून शालेय विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी अभिप्राय मागण्यास सांगितलं आहे.
केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून २ प्रश्नांवर पालकांचं मत मागवण्यात आलं आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर यापैकी कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं पालकांना अनुकूल वाटतं. दुसरं म्हणजे शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या काय अपेक्षा असणार आहेत. राज्यांना पालकांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी ३ दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. १७ जुलै रोजी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, “शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २० तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा”.
एकीकडे अधिकाऱ्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना दुसरीकडे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं कळत आहे.
दिल्लीमधील केंद्रीय विद्यालयातील मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, “पालकांकडून अभिप्राय घेऊन नोंदवण्यासंबंधी कोणताही मेल आम्हाला मिळालेला नाही. मात्र २ आठवड्यांपूर्वी केंद्रीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची पालक अद्यापही शाळा सुरु करण्याविरोधात असल्यावरुन बैठक झाली”. २९ जून रोजी गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक-२ च्या गाइडलाइन्स नुसार शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”