वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती आणखी तणावपूर्ण होईल असे कोणतेही पाऊल कोणत्याही देशांनी उचलू नये, असे आवाहन आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आणि चीनमध्ये मागील काही दिवसांमध्ये सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण झाला होता. तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थाबाबत निर्णय भारत आणि चीनने घ्यायचा असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भारत-चीन सीमेवर भारतासोबतची परिस्थिती एकंदरित स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत आणि चीनमध्ये संवाद आणि सल्लामसलतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त साधने आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर चीनकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”