सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवल्या प्रकरणी 36 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. त्यातील 22 जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बसवलेला पुतळा सन्मानाने काढून स्थलांतरित केला होता. परंतु विना परवाना पुतळा बसवल्या प्रकरणी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हा दाखल केल्यापैकी 6 जणांना रविवारी आणि सोमवारी तर 22 जणांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामध्ये वाई, खंडाळा आणि केंजळ येथील युवकांचा समावेश आहे. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी दिला आहे.