प्रतिसाद मिळत नसलेले लसीकरण सेंटर्स हलवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 115 वॉर्डात जम्बो लसीकरण मोहीम सुरू केली आहे. तसेच लसीकरणाला सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीन मधील काही वॉर्डात खूपच कमी प्रतिसाद मिळत असलयाने या भागांतील लसीकरण सेंटर्स इतरत्र हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील महिनाभरापासून शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच चालला आहे. वाढत्या रुग्णांच्या उपचारासाठी 14 कोविड केअर सेंटर पालिकेने सुरू केले आहे. त्यासोबतच लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन केले जात आहे. त्यामुळे कोविड सेंटरमधीलबेड रिकामे राहत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून शहरातील 115 वॉर्डात 115 सेंटर सुरू करुन जंम्बो लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 5 एप्रिलपासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील चार दिवसात 18 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

प्रभाग क्रमांक चार ते नऊ मधील नागरिकांकडून लस घेण्यासाठी सेंटर्सवर गर्दी होत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन मधील काही वॉर्डातील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रभागांमधील प्रतिसाद मिळत नसलेले सेंटर्स इतरत्र हलवण्याचे पालिकेने ठरवले आहे.

तुकाराम हॉस्टेलचे सेंटर सुरेवाडीत : पदमपूरा भागातील संत तुकाराम हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केलेे होते. त्यानंतर हे कोविड सेंटर बंद करुन त्या ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. मात्र या सेंटरवर नागरिक लस घेण्यासाठी येत नसल्यामुळे हे लसीकरण सेंटर सुरेवाडीत हलवले आहे. तसेच कैलासनगर-अजबनगर हा वॉर्ड मोठा असल्यामुळे कैलासनगर मधील अमर प्राथमिक शाळेत लसीकरण सेंटर सुरू केले. या सेंटरवर नागरिक येत नसल्यामुळे हे सेंटर अजबनगरमध्ये स्थलांतरीत केले आहे.

चार दिवसांत 18 हजार डोस…
जम्बो लसीकरण मोहिमेला सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसात 18 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन मधील काही वॉर्डातील लसीकरण सेंटरवर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे काही सेंटर इतरत्र हलवण्याचे ठरवले आहे, असे पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

Leave a Comment