Tuesday, June 6, 2023

आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावरच, हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदासाठीही तयार : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पुन्हा एकदा नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूका स्वतंत्र लढणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबरोबरच त्यांनी हाय कमांडने निर्णय घेतल्यास मी मुख्यमंत्रीपदासाठी तयार आहे असे देखील म्हण्टले आहे.

नेतेमंडळी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक

एका कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी म्हंटले होते की, तसेच भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी म्हटलंय.

आघाडीत बिघाडीच्या चर्चा

एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार दीर्घकाळ टिकणार असे म्हंटले आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस ,शिवसेना, राष्ट्रवादी सोबत असेल असे म्हंटले होते. मात्र काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

भातखळकरांचा पटोलेंना टोला

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या भूमीकेवर टीका केली आहे. “नाना पटोले ना मुख्यमंत्री व्हावं वाटतय… राहुलजी नाही वाटते पंतप्रधान व्हावं… जनतेला असं अजिबात वाटत नाही भविष्यात वाटण्याची शक्यता नाही… हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे. ” अशा शब्दात भातखळकर यांनी टोला लगावला आहे.