हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. एकीकडे मा. मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्या सोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
एकीकडे मा. मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्या सोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे?
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 11, 2022
निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या वर्षी जून महिन्यात मुंबई पोलिसांनी २२० बुलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर बाईक्स आणि २०० अॅक्टीव्हा गाड्या विकत घेतल्या. निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून या गाड्या खरेदी करण्यात आल्या. मात्र जुलैमध्ये, मोटार वाहन विभागाने मुंबई पोलिसांना एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार आणि 12 मंत्र्यांना ‘Y+’ सुरक्षा देण्यासाठी 47 बोलेरो उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. व्हीआयपी सुरक्षा विभागाकडून तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्याची ही विनंती करण्यात आली. त्यानंतर त्यांना दिलेल्या 47 बोलेरो पैकी 17 गाड्या परत आल्या पण 30 गाड्या अजून परत आलेल्या नाहीत.