हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, सभा सुरू आहेत. सोमवारी माळशिरस तालुक्यात जयसिंह मोहिते पाटील (Jaysinh Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचीही आपल्या कार्यकर्त्यांसह महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर , “राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो” असे उत्तम जानकर म्हणाले.
उत्तम जानकर नेमके काय म्हणाले?
माध्यमांशी संवाद साधताना उत्तम जानकर चांगलेच अजित पवारांवर कडाडताना दिसले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मला काही अजून पक्षातून काढून टाकलेले नाहीये. मीही रोज विचारतोय की मला पक्षातून काढलय का? खरे तर, मी संस्थापक सदस्य असल्यामुळे मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो” विशेष म्हणजे, माळशिरस तालुक्यात झालेल्या बैठकीत रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे, जयसिंह मोहिते पाटील अशी अनेक मंडळी उपस्थित होती. या बैठकीनंतरच जानकरांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
पुढे बोलताना, “जर अजित पवारांना शरद पवारांना पक्षातून काढून टाकत असतील, तर मला अजित पवार यांना काढायला अडचण काय? असा सवालही जानकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, यापूर्वी झालेल्या एका मेळाव्यात बोलताना जानकर यांनी “अजित पवार यांना बारामतीमधून हरवणार आणि मग पक्षचिन्ह घड्याळ घेऊन परत येणार” असे थेट वक्तव्य केले होते. आता तर जानकर यांनी अजित पवारांनाच पक्षातून काढून टाकण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे याला अजित पवारांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.