औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना शासनाने केली आहे. मागील काही दिवसांपासून लसीकरणाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यातच केंद्र शासनाने मागील आठवड्यात 15 ते 18 वयोगटातील तरुणांना ही लस देण्याचे जाहीर केले. औरंगाबाद महापालिकेने यासाठी नियोजनही केले असून, आज सकाळी 10:30 वाजता लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहरात सहा ठिकाणी लस दिली जाईल. ऑफलाइन पद्धतीने लस दिली जाणार आहे.
शहरातील मेल्ट्रोन हॉस्पिटल, राजनगर, एमआयटी हॉस्पिटल एन-4, क्रांती चौक, प्रियदर्शनी विद्यालयात लस देण्यात येणार आहे. 69 हजार 998 करून देण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. तर जिल्ह्याला 2 लाख 13 हजार 823 तरुणांना लस देण्याचे लक्ष्य आहे.