औरंगाबाद | महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणाची गती मंदावली आहे. शहरात केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात ७० केंद्रांवर केवळ १३१५ जणांचे लसीकरण करण्यात आले. आता शुक्रवारी ७० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान,महापालिकेला शासनाकडून २० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत.
शहरात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी सर्वच केंद्रावर लसीकरणासाठी रांगा लागत होत्या. मात्र, लसींचा पुरेसा साठा नसल्याने शासनाने १० मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचे लसीकरण बंद केले आहे. सध्या केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे.
आतापर्यंत या वयोगटातील बहुसंख्य लोकांना पहिला डोस मिळाला आहे. त्यामुळे पहिल्या डोससाठी येणार्यांची संख्या खूपच कमी आहे . शिवाय आता दोन डोसमधील पूर्वीचे ४२ दिवसांचे अंतर वाढवून ते ८४ दिवसांचे करण्यात आले आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठीही कुणी केंद्रावर येत नाही. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात केवळ १३१५ जणांचेच लसीकरण झाले. आता आजही शहरातील ७० केंद्रावर लसीकरण होणार आहे.