औरंगाबाद – आमदार रमेश बोरनारे यांनी चुलत भावजयीला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी वैजापूर पोलिस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक, अशी टीका केली आहे. यासंदर्भात बुधवारी त्यांनी वैजापुरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, बोरनारे प्रकरणात वैजापूर पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. सटाना येथील चुलत भावजयीने भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने शिवसेनेचे आमदार बोरनारे व इतर आठ ते दहा लोकांनी मिळून एका महिलेला भर रस्त्यावर लाथा बुक्क्यानी मारहाण केल्यानंतरही पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी त्या महिलेला पाच तास ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर ३५४ ब ३२६ विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता केवळ जामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळेच आमदार बोरणारे यांनी पोलिसांना हाताशी धरून घटनेनंतर फिर्यादी महिलेवर अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला व ज्यांनी आवाज उठवला त्या लोकांना आता जीवे मारण्याच्या धमक्या आमदार देत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी परिषदेत केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, डॉ.राजीव डोंगरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, गटनेता दशरथ बनकर, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, सुरेश राऊत, नगरसेविका जयमाला वाघ, कल्पना पवार आदींची उपस्थिती होती.
ईडीने आतापर्यंत ज्या कुणावर कारवाई केली, त्यापैकी एकही जण पुढे आला का? किंवा असा दावा केला का? की आमच्यावर पुराव्याशिवाय कारवाई केली. मग कर नाही तर डर कशाला? अशा शब्दात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मलिक यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतरच त्यांना ५५ लाख भरावे लागले होते, याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.