हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचितचाही समावेश असल्याच्या बातम्या सुरु होत्या. त्याबाबतचे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होते. मात्र ‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, असे प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आयएनसीने आधी परवानगी द्यायला हवी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला मान्यता दिली पाहिजे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमच्याशी पत्रव्यवहार करत आहेत. पण, आम्हाला सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे याबाबतचा निर्णय घेत असतात. मात्र पत्रावर त्यांच्या सह्या कुठेच नाहीत. त्यामुळे केंद्रीय काँग्रेस पक्षाची मान्यता आहे असं पत्र आम्हाला आधी मिळायला हवे त्यानंतर आम्ही आघाडीत येण्याचा विचार करु असं आंबेडकर म्हणाले.
भाजपाचे शासन देशाला धोकादायक आहे म्हणून आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढा देण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहोत. आम्हाला कोणताही इगो नाही त्यामुळे कोणी काय वागणूक दिली याचा आम्ही बोभाटा करणार नाही. आम्ही किंवा इतर कोणीही वैयक्तिक हेवेदावे चर्चेत आणू नये. ‘मी’पणा आणि भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकणं यापैकी एका गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.