वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडणूक रिंगणामध्ये उभे असणाऱ्या ५३ उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. कोणी मंदिरामध्ये तर कोणी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आपल्यालाच निवडून द्या आम्ही तुमच्या प्रश्नांचे रामबाण उपाय आहोत असे मतदारांना पटवुन देण्यास सुरुवात केली आहे. प्रचारासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर सुरू झाला आहे. सोशल मीडिया, प्रचाररथ ,बॅनर अशा विविध स्वरूपामध्ये बुधवारपासून प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचाराचे चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल ,चौक, चावडी अशा सर्व ठिकाणी, चार-दोन लोक दिसले की नेतेमंडळी व उमेदवार थांबून आपला प्रचार जाहीरनामा सांगत आहेत. या सर्वांमध्ये बुधवारी जिल्ह्यांमध्ये एका आगळ्या-वेगळ्या प्रचाराची चर्चा दिसून आली.

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

सर्व स्तरातील समाजाला सोबत घेऊन उद्योग निर्मिती, विकासकामे व समाजकारण करतच राजकारण करणे हेच खरे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांना योग्य सुविधा आपण देऊ, असे चित्र वाकळे यांच्या प्रचारात दिसणार हे मात्र नक्की. एकंदरीतच अशाप्रकारे प्रवास करून वाकळे यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Leave a Comment