हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी (VBA) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून (Prakash Ambedkar) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमध्ये त्यांनी, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूरमधून उभ्या राहिलेल्या शाहू महाराजांना (Shahu Maharaj) पूर्ण पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे. तसेच, शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचे आम्ही मानतो, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आज पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “कोल्हापुरातून शाहू शहाजी छत्रपती यांचे नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्यामुळे वंचित त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा असेल. आमच्याकडून त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल”
त्याचबरोबर, “महाविकास आघाडीचे विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही. दुसरं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष रजिस्टर केला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही. किंवा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणते मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.