हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता विदर्भात महत्वाचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणे आणखीन सोपे आणि आरामदायी होणार आहे. कारण की, याठिकाणी लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा 2 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. शक्यतो नवीन वर्षामध्ये ही नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते. यामुळे दूरवरून दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
संपूर्ण राज्यामध्ये संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांचे संख्या मोठी आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी पुणे, मुंबई, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक जात असतात. त्यामुळे श्रीक्षेत्र शेगावला जाण्यासाठी पुणे मुंबईहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नव्या वर्षात 35 एक्सप्रेस धावण्यार
महत्त्वाचे म्हणजे, सध्या रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारकडून मे 2024 पर्यंत देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना एकत्रित जोडणाऱ्या 35 वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची योजना सुरू आहे. यामुळेच रेल्वे विभागाने प्रत्येक तीर्थक्षेत्रांकडून प्रस्ताव देखील मागवले आहेत. यात शेगावला ट्रेन सुरू करण्याचा देखील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाराला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच शेगावला जाण्यासाठी मुंबई आणि पुणे येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल.
थांबा कोणता असेल?
दरम्यान, 554किमी अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि 450 किमीच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब बसण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही दोन महत्त्वाचे स्थानके आहेत त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस या दोन स्थानकांवर थांबा घेण्याची शक्यता आहे.