औरंगाबाद – लग्न समारंभ आटोपून नवरदेवाच्या गावाकडे परतताना करमाड गावाजवळील घाटावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस घाटात कोसळून एक जण ठार, तर प्राथमिक माहितीनुसार दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आडगाव सरक (ता.औरंगाबाद) येथील घाटात काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत नवरदेवाचे नातेवाईक असलेले भगवान शेनफड बोबडे (वय 38, रा. जातेगाव, ता. फुलंब्री) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार दहा जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात ही बस सुमारे वीस फुट खोली असलेल्या दरीत कोसळल्यावरून या अपघाताचा अंदाज लावता येऊ शकतो.
या अपघाताची अधिक माहिती अशी की, आडगाव सरक येथील पठाडे कुटुंबातील मुलाचे औरंगाबाद तालुक्यातीलच पांढरी पिंपळगाव येथील ठोंबरे कुटुंबातील मुलीशी सोमवारी दुपारी लग्न समारंभ होता. यासाठी आडगाव सरक येथून (एमएच 20 डब्ल्यू 9358) बसने वर्हाडी पांढरी पिंपळगाव येथे आले होते. दुपारी अडीचच्या सुमारास अगदी आनंदात व शांततेत विवाह समारंभ ही पार पडला. सर्व विधीही पार पडले. त्यानंतर साडेचारच्या सुमारास वर्हाडास घेऊन ही बस पुन्हा आडगाव सरककडे रवाना झाली. दरम्यान, साडेपाचच्या सुमारास ही बस आडगावचा घाट उतरत असताना अचानक बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात बस सुमारे वीस फुट खोलीच्या दरीत जाऊन पलट्या घेत कोसळली. यावेळी बसमध्ये बसलेल्यांना अपघाताचा अंदाज येईपर्यंत बस दरीत कोसळली होती. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे शेतातुन घरी परतणार्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी मदत केली. घटनास्थळापासुन गावसुध्दा जवळ होते.
त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी हजारोंची गर्दी झाली होती. घटनेची माहिती करमाड पोलिसांना मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, बीट जमादार सोनवणे व इतरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेऊन या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली. ग्रामस्थांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारेे काही गंभीर जखमी झालेल्यांमध्ये आडगाव सरक येथीलच रामदास पठाडे, गिताबाई पठाडे, अंजना पठाडे,अनिता पठाडे, काशीनाथ पठाडे, नंदु पठाडे यांचा समावेश आहे. बर्याच जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. गंभीर जखमींना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयासह इतर विविध खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.